विभागीय परीक्षासंदर्भातील सामाईक बाबींबाबतचे धोरण|विभागीय परीक्षा | Departmental Exam

प्रस्तावना:- शासन निर्णय दि. 31/03/2021 नुसार शासनाच्या विविध प्रशासकीय विभागामार्फत प्रामुख्याने खालील प्रयोजनास्तव विभागीय परीक्षा आयोजित करण्यात येतात. 1) ज्या शासकीय पदावर नियुक्ती झाली आहे त्या पदावर कायम करणे. 2) वरिष्ट्ठ पदावर पदोन्नती देण्यासाठी पात्रता तपासणे.उपरोक्त नमूद प्रयोजनासाठी शासनाच्या विविध प्रशासकीय विभागांमार्फत त्या विभागातील पदांसाठी त्यांच्यास्तरावर विभागीय परीक्षेचे नियम बनविण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक प्रशासकीय विभागाच्या “विभागीय परीक्षा” नियमांमध्ये विविधता आढळून येते. उदा. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठीद्यावयाच्या एकूण संधी, संधीची व्याख्या, परीक्षा उत्तीर्ण होण्यातून सूट देण्यासाठीची वयोमर्यादा, परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी किमान आवश्यक गुण, परीक्षा विहीत संधीत उत्तीर्ण न झाल्यास त्याचे होणारे परिणाम इत्यादी. त्या सर्व विभागीय परीक्षांमधील सामाईक बाबींसाठी एक समान धोरण शासनाकडून निर्माण करण्यात आले आहे.

सदर शासन निर्णयाद्वारे, प्रशासकीय विभागांमार्फत ज्या पदांसाठी विभागीय परीक्षा आयोजीत करण्यात येतात, अशा सर्व विभागीय परीक्षासंदर्भातील सामाईक बाबींचे धोरण निश्चित करण्यात येत आहे. सदर धोरण हे केवळ राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनाच लागू राहील. हे धोरण  जिल्हा परिषदा/ नगरपालीका/ महानगरपालीका/शासनाच्या अधिपत्याखालील मंडळे, महामांडळे,प्राधिकरणे/ अन्य निमशासकीय आस्थापनेवरील कर्मचारी यांना लागू होणार नाही.

Table of Contents

(अ) विभागीय परीक्षासंदर्भातील सामाईक बाबींचे धोरण :-

(I) संबंधित पदावर कायम करण्यासाठी घेण्यात येणारी विभागीय परीक्षा (उदा. सेवाप्रवेशोत्तर परीक्षा ):-

1) परीक्षेला बसण्याची पात्रता:- संबंधित पदावर वैध मार्गाने नामनिर्देशाने नियुक्त झालेली व्यक्ती तसेच संबंधित पदावर पदोन्नतीद्वारे पदस्थापना झालेली व्यक्ती, विभागीय परीक्षेस बसण्यास पात्र राहील.

2) विभागीय परीक्षेचा उद्देश:- शासकीय कर्मचाऱ्यास संबंधित शासकीय कामकाजाचे ज्ञान प्राप्त झाले आहे  किंवा कसे या बाबीची पडताळणी करण्यासाठी विभागीय परीक्षा आयोजित करण्यात येते. सबब, विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

3) परीक्षेला बसण्याकरिता संधी:- 

(3.1) संधी:- संधी म्हणजे संबंधित प्रशासकीय विभागाने आयोजित केलेली विभागीय परीक्षा ही या परीक्षेला बसण्यासाठी उमेदवारांना देण्यात आलेली संधी असेल.सबब, प्रशासकीय विभागामार्फत आयोजित होणारी परीक्षा हीच संधी म्हणून गणण्यात येणार असल्यामुळे, परीक्षेला बसण्यास पात्र असूनही जर उमेदवाराने परीक्षेचा अर्ज सादर केला नाही किंवा परीक्षेचा अर्ज सादर करूनही परीक्षेस उपस्थित राहीला नाही, तरीही त्या वर्षी उपसिथत आयोजीत झालेली परीक्षा ही संबंधित उमेदवारास देण्यात आलेली एक संधी म्हणून गणण्यात येईल.

(3.2) संधीची संख्या:- शासकीय सेवेतील संबंधित पदावर नियुक्तीच्या दिनांकापासून (सरळसेविका अथवा पदोन्नतीद्वारे नियुक्ती ) एकूण 3 संधीमध्ये परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. तथापी, ज्या पदांना परिविक्षा कालावधी लागू आहे, अशा पदावरील अधिकारी/कर्मचारी यांना सदर परीक्षा परिवीक्षा कालावधीमध्येच उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

(3.3) संधीची गणना:- शासकीय सेवेत ज्या दिनाकांस संबंधित पदावर कम्रचारी रूजू होईल.(सरळसेवा अथवा पदोन्नतीद्वारे नियुक्ती आदेशानुसार ) त्या रूजू दिनांकानंतर प्रथम ज्यावेळी विभागीय परीक्षेसाठीचा अर्ज सादर करण्याची कार्यवाही सुरू होईल, त्या विभागीय परीक्षेचे आयोजन ही संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांची पहली संधी म्हणून गणण्यात येईल. तसेच त्यानंतर अनुक्रमे आयोजित होणाऱ्या पुढील दोन परीक्षा या पुढील दुसरी व तिसरी संधी म्हणून गणण्यात येईल.

त्यामुळे, शासकीय सेवेतील संबंधित पदावर शासकीय कर्मचारी ज्या दिनांकासा रूजू होईल, त्या दिनांकापूर्वी जर त्या कॅलेंडर वर्षामधील विभागीय परीक्षेसाठीचा अर्ज सादर करण्याचा दिनांक समाप्त झाला असेल तर संबंधित शासकीय कर्मचारी सदर परीक्षेस बसू शकत नसल्यामुळे सदर आयोजित होणारी परीक्षा ही संधी गणण्यात येणार नाही.

(3.4) विहित संधीत परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास होणारे परिणाम:- संबंधित पदावर कायम होण्यासाठीची विभागीय परीक्षा  अ.क्र. 3.2 मध्ये नमूद केल्यानुसार विहीत संधीत उत्तीर्ण न झाल्यास, संबंधिताची वेतनवाढ रोखण्यात येईल. तसेच संबंधित कर्मचारी ज्यावेळी सदर परीक्षा उत्तीर्ण होईल अथवा परीक्षा उत्तीर्ण  होण्यातून सूट प्राप्त होईल त्यानंतर त्याला वेतनवाढ अनुज्ञेय राहील. मात्र पुढील सर्व वेतनवाढी या, जणू काही वेतनवाढ रोखण्यात आली नव्हती असे समजून देय होतील. तथापी, थकबाकीची रक्कम अनुज्ञेय नसेल.

परंतु, गट-अ व गट-ब या राजपत्रित पदावंर थेट नियुक्त होणाऱ्या  अधिकाऱ्यांना परिवीक्षा धोरणानुसार परिवीक्षाधीन कालावधीतच सदर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा त्यांना सेवेमधून काढण्यात येईल. तसेच गट-क मधील ज्या पदांना सेवाप्रवेश नियमाद्वारे परिवीक्षाधीन कालावधी लागू केला आहे अशा सर्व अधिकारी व कर्मचारी यांना परिवीक्षाधीन कालावधीतच सदर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे क्रमप्राप्त आहे. अन्यथा त्यांना सेवेमधून काढण्यात येईल.

(3.5) परीक्षेला बसण्याची अनुज्ञेय:- शासकीय कर्मचाऱ्यांने संबंधित पदावर कायम होण्यासाठी असलेली विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्यामुळे, परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत या परीक्षेस कितीही वेळा बसता येईल.परंतु, गट-अ व गट-ब या राजपत्रित पदांना परिवीक्षाधीन कालावधी लागू असल्यामुळे त्यांनी सदर विभागीय परीक्षा परिवीक्षाधीन कालावधीमध्येच उत्तीर्ण होणे क्रमप्राप्त आहे. त्यांना

परीक्षेला बसण्याची अमर्याद संधी मिळणार नाही. तसेच गट-क च्या ज्या पदांना सेवाप्रवेश नियमाद्वारे परिवीक्षाधीन कालावधीची विवक्षितपणे तरतूद करण्यात आलेली आहे. अशा पदांनाही विभागीय परीक्षा परिवीक्षाधीन कालावधीमध्येच उत्तीर्ण होणे क्रमप्राप्त आहे. त्यांना परीक्षेला बसण्याची अमर्याद संधी मिळणार नाही.

4) परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट :- शासन निर्णय दि. 01/03/2018 नुसार सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना वयाची 50 वर्ष पूर्ण झाल्याच्या दिनांकांस सूट अनुज्ञेय राहील.

5) परीक्षेचे आयोजन प्रशासकीय विभागांच्या स्तरावरून करणे:- प्रशासकीय विभागांनी त्यांच्या विभागीय परीक्षांचे आयोजन शासन परिपत्रक दि. 22/09/2020 नुसार प्रशासकीय विभागाच्या स्तरावरुन करण्याचे आदेशीत करण्यात आले आहे.

6) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेतील किमान गुणांबाबतचे मानक:- विभागीय परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये नमूद केलेल्या सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी,उमेदवरास प्रत्येक विषयात किमान 50 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

7) परीक्षा उत्तीर्ण होण्याचा दिनांक:- विभागीय परीक्षेचा शेवटच्या पेपर नंतरच्या लगतच्या दुसऱ्या दिवसाचा दिनांक हा परीक्षा उत्तीर्ण होण्याचा दिनांक समजण्यात यावा.

8) परीक्षा विहीत संधीत उत्तीर्ण झाली नाही म्हणून रोखलेली वेतनवाढ अदा करण्याचा दिनांक :-

वेतनवाढ रोखलेला उमेदवार त्यानंतर झालेल्या ज्या परीक्षेत उत्तीर्ण होतो, त्या परीक्षेच्या शेवटच्या पेपरच्या दुसऱ्या दिवसाचा दिनांक हा परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दिनांक असल्यामुळे,सदर दिनांकांनतर येणाऱ्या जानेवारी/जुलै महिन्यात त्याची रोखलेली वेतनवाढ अदा करण्यात यावी.

II) वरिष्ठ पदावर पदोन्नती देण्यासाठीची पात्रता परीक्षा :-

1) परीक्षेला बसण्याची पात्रता:- संबंधित पदावर वैध मार्गाने नामनिर्देशनाने नियुक्त झालेली व्यक्ती तसेच संबंधित पदावर पदोन्नतीद्वारे पदस्थापना झालेली व्यक्ती, विभागीय परीक्षेस बसण्यास पात्र राहील.

2) विभागीय परीक्षेचा उद्देश:- वरिष्ट्ठ पदावर पदोन्नती देण्यापूर्वी , वरिष्ट्ठ पदावर काम करण्यासाठीची क्षमता तपासण्यासाठी सदर परीक्षा आयोजीत करण्यात येते. त्यामुळे पदोन्नती देण्यासाठी सदर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होर्ण अनिवार्य राहील.

3) परीक्षेसाठी प्रथम केव्हा अर्ज सादर करावा यासाठीचा निकष

1नियुक्तीच्या पदावर कायम होण्यासाठीची विभागीय परीक्षा नसल्यास –

 

शासकीय सेवेतील संबंधित पदावर ज्या दिनांकांस कर्मचारी रूजू होईल (सरळसेवा अथवा पदोन्नतीद्वारे नियुक्ती आदेशानुसार ) त्या रूजू दिनांकानंतर, प्रथम ज्या दिनांकास पदोन्नतीसाठीच्या विभागीय परीक्षेसाठीचा अर्ज सादर करण्याची कार्यवाही सुरू होईल त्यावेळी संबंधित उमेदवार सदर परीक्षेस अर्ज सादर करु शकेल.
2कार्यरत पदावर कायम होण्यासाठीची विभागीय परीक्षा असल्यास –

 

शासकीय सेवेतील संबंधित पदावर कायम होण्यासाठीची विभागीय परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दिनांकानंतर, प्रथम ज्या दिनांकांस पदोन्नतीसाठीच्या विभागीय परीक्षेसाठीचा अर्ज सादर करण्याची कार्यवाही सुरू होईल त्यावेळी संबंधित उमेदवार सदर परीक्षेस अर्ज सादर करु शकेल.

4) परीक्षेला बसण्याकरीता संधी:- सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय संबंधित अधिकारी/कर्मचारी हे वरिष्ट्ठ पदावर पदोन्नतीसाठी पात्र ठरणार नसल्यामुळे, सदर विभागीय परीक्षेसाठी ठराविक संधीची संख्या निश्च‍ित  करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. सबब, सदर विभागीय परीक्षेसाठी संधीची कोणतीही मर्यादा निश्चित करण्यात येत नाही.

5) परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट:– शासन निर्णय दि 01/03/2018 नुसार कर्मचाऱ्यांने सध्याच्या पदावर किमान 15 वर्ष सेवा पूर्ण केल्याचा दिनांक किंवा त्यांच्या वयाची 50 वर्ष पूर्ण झाल्याचा दिनांक यापैकी जे नंतर घडेल त्यानंतरच्या लगतच्या  दिनांकास त्याला सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट अनुज्ञेय राहील.

6) परीक्षेचे आयोजन प्रशासकीय विभागांच्या स्तरावरून करणे:– सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या विभागीय परीक्षांचे आयोजन शासन परिपत्रक दि. 22/09/2020 नुसार प्रशासकीय विभागाच्या स्तरावरुन करावे.

7) परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेतील किमान गुणांबाबतचे मानक:- विभागीय परीक्षेच्या अभ्यासक्रमांमध्ये नमूद केलेल्या प्रत्येक विषयामध्ये उत्तीर्ण होण्यासाठी,उमेदवारास प्रत्येक विषयात किमान 50 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.

8) परीक्षा उत्तीर्ण होण्याचा दिनांक:- विभागीय परीक्षेच्या शेवटच्या पेपर नंतरच्या लगतच्या दुसऱ्या दिवसाचा दिनांक हा परीक्षा उत्तीर्ण होण्याचा दिनांक समजण्यात यावा.

9) विभागीय परिक्षेसाठी महत्वाचे:- वरिष्ट्ठ पदावर पदोन्नती देण्यासाठीच्या पात्रता परीक्षेच्या अभ्यासक्रमात खालील अभ्यासक्रमाचा समावेश करण्याचे शासन आदेशीत आहे.

अ) माहितीचा अधिकार अधिनियम-2005

ब) महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधिनियम- 2005

क) महाराष्ट्र शासकीय कामकाजात विलांब करणेस प्रतिबंध करण्याचा अधिनियम-2005 चे प्रकरण क्रमांक 3.

ड) “आपत्ती व्यवस्थापन”

अ ते ड ची माहिती आगोदच blog  वर दिली आहे.

ब) प्रशासकीय विभाग:-

काही मुददे हे प्रशासकीय विभागासंबंधी आहे. प्रशासकीय विभागास अभ्यासक्रम इ. ठरविण्याचे अधिकार देण्यात आले आहे. जसे जसे सर्व विभाग अभ्यासक्रम ठरविल ते आपण blog वर देऊ. सध्या आरोग्य विभागासंबंधीत अभ्यासक्रम आला आहे. तो आपण आपल्या blog/website वर दिलेला आहे.

वाचाल तर वाचाल. दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत: ज्ञान आत्मसात करा.

 

Leave a Reply