म.ना.से. रजा नियम-1981 | Leave rule-1981

प्रस्तावना:- रजा ही शासकीय कर्मचारी यांनी मंजूर झाल्यावरच त्याचा उपयोग घ्यावा. अधिकारी (रजा मंजूर करणारा अधिकारी) जो पर्यंत रजा मंजूर करत नाही. तो पर्यंत रजेवर जाता येत नाही. म्हणून रजेवर कर्मचाऱ्यांचा हक्क नाही. रजा मंजूर झाली तरी रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्यांना अधिकारी कधीही बोलवू शकतो. रजेचे प्रकार आहे. त्या प्रमाणे रजा मंजूर करण्यात येते.

1. म.ना.से. रजा नियम-1981 चे शासकीय पुस्तक

2. म.ना.से. रजा नियम-1981 ची पीपीटी

3.म.ना.से. रजा नियम-1981 ची पीपीटी

Table of Contents

1.शासकीय कर्मचा-यास रजा मंजूर करतेवेळी विचारात घ्यावयाच्या बाबी :-

(नियम क्रमांक 10 ते 12) शासकीय कर्मचा-यास कामावर अनुपस्थित राहण्यासाठी सक्षम प्राधिका-याने दिलेली परवानगी म्हणजे रजा होय.  मात्र हक्क म्हणून रजा मंजूर करण्याची मागणी करता येणार नाही.  कार्यालयीन कामाची निकड व परिस्थिती पाहून रजा मंजूर करण्याविषयीचा निर्णय घेतला जाईल. रजा मंजूर करतेवेळी एखाद्या कार्यालयातच एकाच वेळी आलेले रजेचे सर्व अर्ज एकत्र विचारार्थ घ्यावेत व त्यापैकी कोणत्या कर्मचा-याला सहजगत्या रजा मंजूर करण्यासारखी परिस्थिती आहे याचा सक्षम प्राधिका-याने प्रथम विचार करावा.

  त्यापैकी निरनिराळया अर्जदारांना कोणकोणत्या प्रकारची रजा देय व अनुज्ञेय आहे व पूर्वीच्या रजेवरुन आल्यानंतर प्रत्येक अर्जदाराने किती व कोणत्या प्रकारची सेवा बजावली आहे याही बाबी विचारात घ्याव्यात.  तसेच पूर्वीच्या रजेवरुन एखाद्या कर्मचा-याला सक्तीने परत बोलाविण्यात आले होते काय व असल्यास त्या मागची कारणे इत्यादी बाबींचा सांगोपांग विचार रजा मंजूर करतेवेळी केला पाहिजे.  सर्व अर्जाचा एकत्रित विचार करताना रजा मंजुरीमुळे एखाद्या संवर्गातील कर्मचा-यांची संख्या खूपच कमी होता कामा नये ही बाब देखील लक्षात घेतली पाहिजे.

2.एका रजेच्या प्रकारचे दुस-या प्रकारात परिवर्तन / वेगवेगळया प्रकारच्या रजा एकमेकींना जोडून घेणे अखंड रजेचा कालावधी:-

(नियम क्रमांक 14 ते 16) एखाद्या कर्मचा-यास एखादी रजा मंजूर झाल्यानंतर व ती त्याने उपभोगल्यानंतर त्याच्या विनंतीवरुन अशी रजा भूतलक्षी प्रभावाने दुस-या रजेच्या प्रकारात बदलता येते, मात्र ज्या दिवसापासून अशी दुसरी रजा मंजूर करावयाची आहे त्या दिवशी ती देय व अनुज्ञेय असली पाहिजे.           

            नियमानुसार मंजूर होऊ शकणा-या निरनिराळया प्रकारच्या रजा एकमेकींना जोडून घेता येतात.  मात्र, किरकोळ रजेला जोडून या रजा घेता येत नाहीत, कारण किरकोळ रजा ही महाराष्ट्र नागरी सेवा नियमाप्रमाणे मान्यताप्राप्त रजा नाही.  परंतु एखादा कर्मचारी अर्ध्या दिवसाच्या किरकोळ रजेवर गेला व त्यानंतरच्या दिवसापासून त्यास इतर एखादी रजा घ्यावी लागली तर मात्र रजेपूर्वी ही अर्ध्या दिवसाची किरकोळ रजा जोडून घेता येईल. सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त 5 वर्षापर्यंत एखाद्या कर्मचा-यास रजा मंजूर करता येते.  त्यापेक्षा जास्त कालावधी असेल तर त्यास शासनाची मंजूरी आवश्यक आहे.

3.राजीनामा किंवा बडतर्फीनंतर रजा मंजुर करणे:-

(नियम क्रमांक 22) एखाद्या शासकीय कर्मचा-यास सेवेतून कमी किंवा बडतर्फ करण्यात आले किंवा त्याने सेवेचा राजीनामा दिला असेल तर त्याच्या रजा खात्यावर शिल्लक असलेल्या रजेसेबंधी त्याचे सर्व हक्क समाप्त होतात. परंतु बडतर्फ किंवा सेवेतून कमी केलेल्या शासकीय कर्मचा-यास अपीलानंतर पुन्हा कामावर घेण्याचा निर्णय झाला तर मात्र त्याचे रजेवरील सर्व हक्क पुनर्स्थापित होतात.      भरपाई निवृत्तीवेतन किंवा रुग्णता निवृत्तीवेतन किंवा उपदानावर सेवा निवृत्त झालेल्या एखाद्या सेवकास पुनर्नियुक्ती देण्यात आली व त्याची पूर्वीची सेवा हिशोबात धरण्याची परवानगी देण्यात आली तर मात्र या सेवेबरोबरच पूर्वीची सर्व रजा देखील हिशोबात धरण्याचा त्यास हक्क प्राप्त होतो.

            एखाद्या शासकीय कर्मचारी शासनाखालील दुस-या पण मूळ कार्यालयाबाहेरील किंवा विभागाबाहेरील एखाद्या पदाकरिता योग्य त्या मार्गाने अर्ज अग्रेषित करील व त्याची त्या पदासाठी निवड झाली तर आपल्या अगोदरच्या सेवेचा राजीनामा देईल तेव्हा असा राजीनामा लोकसेवेच्या दृष्टीने राजीनामा मानला जाणार नाही व पहिली सेवा सोडून देणे व दुस-या पदावर हजर होणे यामधील खंड, नेहमीच्या नियमानुसार अनुज्ञेय असणा-या पदग्रहण अवधीपेक्षा जास्त नसेल तर मात्र त्याला आपली पूर्वीची सर्व रजा नविन नियुक्तीच्या ठिकाणी हिशोबात धरण्याचा हक्कम राहील.

4.बदली झालेल्या किंवा बदलीनंतर पदग्रहण अवधीमध्ये असणा-या कर्मचा-याला रजा मंजूर करण्याविषयीच्या तरतुदी:- 

            (नियम क्र. 30) एखादा कर्मचारी रजेवर असताना त्याची दुस-या कार्यालयात बदली झाली तर अशी रजा मंजूर करण्याविषयीचे आदेश काढणे व त्या कर्मचा-यास रजावेतन प्रदान करणे ही जबाबदारी अगोदरच्या, म्हणजे जेथून बदली झाली आहे त्या कार्यालयाची असेल. कर्मचा-यास एखादी रजा मंजूर झाली असेल व या रजा समाप्तीनंतर त्याच्या बदली आदेशाची अंमलबजावणी व्हावयाची असेल व त्यास वाढीव रजा हवी असेल तर या वाढीव रजेच्या मंजुरीविषयीचा विचार नविन म्हणजेच दुस-या कार्यालयाने करावा.

            कर्मचा-यास एखादी रजा मंजूर झाली असेल व त्यास वाढीव रजा हवी असेल आणि त्याच्या बदलीची अंमलबजावणी अशा वाढीव रजेनंतर होणार असेल तर त्याच्या रजा मंजुरीची जबाबदारी जुन्या म्हणजेच पूर्वीच्या कार्यालयाची असेल. बदलीनंतर पूर्वीच्या पदाचा कार्यभार सोडून कर्मचारी पदग्रहण अवधीमध्ये असेल व त्याने रजा मंजूरीसाठी अर्ज केला तर असा अर्ज तो कर्मचारी नविन पदावर ज्या कार्यालयामध्ये हजर होणार असेल त्याच कार्यालयाकडे केला पाहिजे व रजा मंजुरीचा आदेश काढणे व रजा वेतन प्रदान करणे या जबाबदा-या त्याच कार्यालयाच्या असतील.

5.राजपत्रित अधिका-यांना वैद्यकीय कारणास्तव रजा मंजूर करण्याबाबतच्या तरतुदी:-

            (नियम क्रमांक 40) एखाद्या राजपत्रित अधिका-यांने मागितलेली रजा दोन महिने किंवा त्याहून कमी मुदतीची असेल तर त्याने प्राधिकृत वैद्यकीय व्यावसायी किंवा तत्सम दर्जाच्या वैद्यकीय अधिका-याकडून नमुना 3 मधील प्रमाणपत्र रजेच्या अर्जासोबत सादर केले पाहिजे.

            त्याने मागितलेली रजा दोन महिन्याहून अधिक कालावधीची असेल तर आणि वरील प्रमाणे प्रमाणपत्र त्याने सादर केले असेल तर त्यास वैद्यकीय मंडळापुढे उपस्थित राहून तपासणी करुन घेणे आवश्यक राहील. अधिकारी ज्या जिल्हयात काम करीत असेल किंवा आजारी पडला असेल किंवा उपचारासाठी गेला असेल त्या जिल्हयाच्या शल्य चिकित्सकाला वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याची विनंती रजा मंजुर करणारा सक्षम प्राधिकारी करेल.

6.अराजपत्रित कर्मचा-यास वैद्यकीय कारणास्तव  रजा मंजूर करण्याबाबतच्या तरतुदी:-

            (नियम क्रमांक 41) एखाद्या अराजपत्रित कर्मचा-यास वैद्यकीय कारणास्तव रजा घ्यावयाची असेल   तर त्याने कार्यालयाकडे विहित नमुन्यात अर्ज करावा.  अर्जासोबत रजा नियमांना जोडलेल्या परिशिष्ट 5 मधील नमुना क्रमांक 4 प्रमाणे एक वैद्यकीय प्रमाणपत्र जोडले पाहिजे.  अशा प्रमाणपत्रात आजाराचे स्वरुप व आजाराचा संभाव्य कालावधी स्पष्टपणे नमूद केलेला असावा.

            एखाद्या कर्मचा-याची वैद्यकीय तपासणी केली असता तो कर्मचारी कामावर हजर होण्यास पात्र ठरू शकणार नाही अशी वाजवी शक्यता दिसत असेल तर या प्रकरणात त्यास रजा मंजुरीची शिफारस संबंधित वैद्यकीय अधिकारी करणार नाही, तर असा शासकीय कर्मचारी शासकीय सेवेसाठी कायमचा अपात्र आहे असेच मत तो वैद्यकीय अधिकारी आपल्या प्रमाणपत्रात नमूद करेल.  एखाद्या कर्मचा-याने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले असेल व रजा मंजूर करणा-या अधिका-याला वाटले तर तो जिल्हा शल्यचिकित्सकापेक्षा कमी दर्जाच्या नसणा-या वैद्यकीय अधिका-यास संबंधित कर्मचा-याची तपासणी करण्याची विनंती करुन दुसरे वैद्यकीय मत मागवू शकतो.

            वरीलप्रमाणे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाले म्हणजे संबंधित कर्मचा-यास रजा मिळण्यास हक्क प्राप्त झाला असे नाही.  रजा मंजूर करणारा अधिकारी स्वेच्छा निर्णयानुसार जास्तीत जास्त 3 दिवसांपेक्षा कमी कालावधीच्या रजेसाठी अशा कर्मचा-यास नमुना 4 मधील प्रमाणपत्र सादर करण्यापासून सूट देऊ शकतो. मात्र अशी रजा परिवर्तीत रजा समजली जाणार नाही व इतर कोणत्याही रजा खात्यावर खर्ची टाकण्यात येईल.

7.रजा संपण्यापूर्वी कर्मचा-यास कामावर परत बोलावणे:-

            (नियम क्रमांक 46) रितसर रजा मंजूर झाल्यानंतर अशी रजा उपभोगत असणा-या कर्मचा-यास कार्यालयीन कामाची निकड लक्षात घेऊन रजा संपण्यापूर्वी कामावर हजर होण्यासाठी सांगता येऊ शकते.  मात्र याबाबतीतील आदेशामध्ये अशा कर्मचा-याचे कामावर परत हजर होणे ऐच्छिक आहे की, सक्तीचे हे नमूद केले पाहिजे.

            कामावर परत हजर होणे ऐच्छिक असेल व कर्मचारी हजर झाला तर अशा प्रसंगी त्यास कोणतीही प्रवास खर्च सवलत मिळू शकणार नाही. कामावर हजर होणे सक्तीचे असेल तर, आणि तो कर्मचारी जर मुख्यालयाहून दूर, इतर ठिकाणी, भारतातच असेल तर त्याला कामावर हजर होण्यासाठी ज्या दिवशी प्रवासास सुरुवात करावी लागते त्या दिवसापासून तो कामावर हजर असल्याचे समजण्यात येईल व त्यास नियमानुसार प्रवासभत्ता देखील मिळेल.  तसेच पदावर रुजू होईपर्यंतच्या कालावधीसाठी त्यास त्या रजेच्याच दराने वेतन मिळेल.

            एखादा कर्मचारी जर भारताबाहेर रजा उपभोगत असेल व त्यास परत बोलावण्यात आले तर तो परत यायला निघाल्यापासून तो भारतात पोहोचला असेल तो पर्यंतचा कालावधी व भारतात पोहोचल्यापासून तो पदावर रुजू होईपर्यंतचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजला जाईल व या काळात त्यास त्याच्या रजेच्या दराने रजा वेतन मिळेल.  शिवाय त्यास भारतात येण्यासाठी तो ज्या तारखेस निघेल त्या तारखेपर्यंत त्याच्या रजेचा निम्मा कालावधी किंवा 3 महिने, यापैकी कमी असेलेला कालावधी पूर्ण झालेला नसेल तर, भारतातून बाहेर जाण्याच्या प्रवासाचा खर्चही त्यास परत मिळेल.  भारतात ज्या ठिकाणी तो पोहोचेल त्या ठिकाणापासून कामावर हजर होण्याच्या ठिकाणापर्यंतचा प्रचलित नियमानुसार प्रवासभत्ता देखील त्यास मिळू शकेल.

8.देय अनुज्ञेय रेजेचे प्रकार:-

(रजा नियम प्रकरण क्र. 5 ते 7 मध्ये रजेचे प्रकार विहित करण्यात आले आहेत.)शासकीय कर्मचा-यांना सर्वसाधारण व विशेष अशा रजांचे पुढील प्रकार उपलब्ध आहेत.

अ) सर्वसाधारण रजा :

  • अर्जित रजा (अर्नड् लीव्ह)
  • अर्धवेतनी रजा (हाफ पे लीव्ह)
  • परिवर्तीत रजा ( कॉम्युटेड लीव्ह)
  • अनर्जित रजा / नादेय रजा (लीव्ह नॉट डयू)
  • असाधारण रजा (एक्स्ट्रॉर्डिनरी लीव्ह)

ब) विशेष रजा :

  • प्रसूती रजा (मॅटर्निटी लीव्ह)
  • विशेष विकलांगता रजा (स्पेशल डिसेबिलीटी लीव्ह)
  • रुग्णालयीन रजा (हॉस्पिटलायझेशन लीव्ह)
  • खलाशांची रुग्णता रजा (सीमन्स सिकनेस लीव्ह)
  • क्षयरोग इ. साठी रजा (टि.बी. लीव्ह)
  • अध्ययन रजा (स्टडी लीव्ह)

9.अर्जित रजा:-

अ.दीर्घ सुटी विभागांव्यतिरीक्त इतर विभागातील कर्मचा-यांच्या अर्जित रजेची गणना:-

            (नियम क्र. 50 व 51, शासन निर्णय क्र. वेआशि-1287/399/87/सेवा 10, दिनांक 11.10.88,, शासन निर्णय  दिनांक 9.11.90, शासन निर्णय दिनांक 01.01.1991, शासन निर्णय दिनांक 15.01.2001शासन निर्णय दिनांक 11.10.2011 ) दिनांक 24.06.2016.

            दीर्घ सुटी विभागाव्यतिरीक्त इतर विभागांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांना 31.12.90 पर्यंत त्यांच्या कर्तव्य कालावधीच्या 1/11 दराने अर्जित रजा मिळत असे.  परंतु वरील दिनांक 9.11.90 च्या शासन निर्णयानुसार हे प्रमाण बदलले आहे.  आता अशा कर्मचा-यांना प्रत्येक कॅलेंडर वर्षासाठी 30 दिवस अर्जित रजा मिळू शकते.  दिनांक 1.1.91 पासूल लागू असणा-या या शासन निर्णयानुसार प्रत्यक्ष रजेची गणना पुढील प्रमाणे करण्यात येते.

            कर्मचा-याच्या अर्जित रजा खाती प्रत्येक कॅलेंडर वर्षाच्या जानेवारी आणि जुलै महिन्याच्या पहिल्या दिवशी, प्रत्येक सहामाही कालावधीसाठी 15 दिवस अशी दोन हप्त्यांमध्ये अर्जित रजा आगाऊ जमा करण्यात यावी.  या कर्मचा-याच्या रजा खाती मागील अर्ध्या वर्षीच्या अखेरीस शिल्लक असलेली अर्जित रजा, पुढील अर्ध्या वर्षाच्या रजेमध्ये मिळविण्यात यावी. अर्जित रजा साठविण्याची कमाल मर्यादा 300 दिवस असेल, मात्र सहा महिन्याच्या आरंभीची 300+15 दिवस अशी रजा दाखविण्यात यावी व ही जादा 15 दिवस रजा त्या सहामाहीत उपभोगली नाही तर सहामाहीच्या अखेरीस व्यपगत करावी.

            अर्जित रजा साठवून ठेवण्याची मर्यादा दिनांक 31.8.88 पर्यंत 180 दिवस एवढी होती.  दिनांक 11.10.1988 च्या शासन निर्णयानुसार ही मर्यादा दिनांक 1.9.1988 पासून 240 पर्यंत वाढविण्यात आली व दिनांक 15.1.2001 च्या शासन निर्णयानुसार हि मर्यादा दिनांक 1.2.2001 पासून 300 दिवस पर्यंत वाढविण्यात आली आहे. ज्या शासकीय कर्मचा-याची नेमणूक अर्ध्या कॅलेंडर वर्षाच्या मध्येच झाली असेल त्याच्या बाबतीत, असा कर्मचारी त्या सहामाही कालावधीमध्ये जेवढी सेवा करण्याची शक्यता आहे अशा प्रत्येक पूर्ण कॅलेंडर महिन्याच्या सेवेसाठी अडीच दिवस या दराने त्याच्या खाती अर्जित रजा जमा करावी.

            उदा. एखादा कर्मचा-याची नेमणूक 15 सप्टेंबर रोजी झालेली असेल, तर त्या अर्ध्या वर्षात त्याची, (सप्टेंबर महिना वगळून) तीन महिने, (ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर) एवढी सेवा होईल.  म्हणजेच प्रत्येक महिन्यात अडीच दिवस या दराने 3×2.5= 7.5 म्हणजेच पूर्णांकांत 8 दिवस रजा जमा करावी लागेल.

            सहामाही कालावधीच्या मध्ये राजीनामा अथवा सेवानिवृत्तीमुळे सेवा समाप्त होणार असेल तर अशा कर्मचा-याच्या बाबतीत देखील वरीलप्रमाणेच अर्जित रजेची गणना करण्यात यावी.  एखाद्या कर्मचा-याने अर्ध्या वर्षात असाधारण रजा घेतली असेल किंवा तो निलंबित असेल तर अशा कालावधीच्या 1/10 एवढया दराने त्याची अर्जित रजा कमाल 15 दिवसांच्या मर्यादेत पुढील सहामाहीच्या वेळी कमी करण्यात यावी.  तसेच क्षयरोग इ. साठी जी एक वर्ष पूर्ण वेतनी विशेष रजा मिळते या रजेच्या कालावधी मध्ये सुध्दा अर्जित रजा जमा होणार नाही म्हणजेच ती पुढील सहामाही मध्ये 1/10 या दराने वजा करण्यात यावी.

ब.दीर्घ सुटी विभागातील कर्मचा-यांना अर्जित रजा:-

            (नियम क्रमांक 52 ते 54) ज्या विभागाला किंवा विभागाच्या एखाद्या विशिष्ट भागाला नियमित दीर्घ सुटया दिल्या जातात त्यास  दीर्घ सुटी विभाग असे म्हणतात.  उदा. शाळा, महाविद्यालय, न्यायालय इत्यादी.  तेथे सेवेत असलेल्या कर्मचा-यांना सुटीच्या कालावधीत कामावर गैरहजर राहण्याची परवानगी असते.अशा विभागात काम करणा-या शासकीय कर्मचा-याने एखाद्या वर्षात सुटी घेतली असेल तर, त्या वर्षात केलेल्या कामाच्या संबंधात कोणतीही अर्जित रजा मिळण्याचा त्यास हक्क असणार नाही.           

            एखाद्या वर्षात या विभागातील एखादा कर्मचारी कोणतीही दीर्घ सुटी घेत नसेल तर त्याला त्या वर्षाच्या संबंधात नियम 50 अन्वये अर्जित रजा अनुज्ञेय असेल.  एखाद्या कर्मचा-याने दीर्घ सुटीपैकी काही भागाचा लाभ घेतला असेल तर त्या वर्षाच्या संबंधात, त्याने लाभ न घेतलेल्या भागातील दिवसांचे दीर्घसुटीशी जे प्रमाण असेल त्या प्रमाणात 30 दिवसांपैकीची अर्जित रजा घेण्याचा हक्क असेल.

            (वित्त विभाग, शासन निर्णय  दिनांक 6.12.1996) उपरोक्त शासन निर्णयानुसार शासकीय, तसेच जिल्हा परिषद शाळेतील दीर्घसुटी विभागामध्ये कार्यरत असलेल्या शिक्षक, प्राचार्य, मुख्याध्यापक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक यांना अनुज्ञेय असणा-या अर्धवेतनी रजा बंद बंद करण्यात येऊन त्या ऐवजी त्यांना दिनांक 1.1.1997 पासून सहा महिन्याला पाच दिवस अर्जित रजा मिळू शकेल.सहामाही कालावधीमधील असाधारण रजा व अकार्यदिन यावर अर्जित रजा जमा होणार नाही.  म्हणजे सहामाहीच्या प्रारंभी आगाऊ जमा झालेली रजा 1/30 या प्रमाणात नंतर कमी करण्यात येईल. अर्ध कॅलेंडर वर्षाच्या मध्येच एखाद्या कर्मचा-याची नियुक्ती झाली तर त्या सहामाही मधील पूर्ण कॅलेंडर महिन्यासाठी 5/6 या प्रमाणात अर्जित रजा जमा होईल मात्र या रजा समर्पित करुन रोखीकरणाचा लाभ दिला जाणार नाही. शाळेवरील शिक्षकेतर कर्मचा-यांना मात्र वरील अर्जित रजेव्यतिरीक्त नियम क्र. 54 अन्वये अनुज्ञेय असणा-या अर्जित रजा देखील मिळू शकतील.

क.अर्जित रजा उपभोगणे रजेच्या समर्पणासंबंधीच्या (सरेंडर ऑफ अर्नड् लीव्ह) तरतुदी:-

            (नियम क्र. 50(2) (3), 70) एखाद्या कर्मचा-यास त्याच्या रजा खात्यावरुन एका वेळी जास्तीत जास्त 180 दिवसांपर्यंत अर्जित रजा (खाजगी कारणास्तव) मंजूर करता येईल. रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन कर्मचा-यास लागू असेल तेच त्याला या रजा कालावधीत मिळेल.  सेवा कालावधी मध्ये शिल्लक अर्जित रजेमधून काही रजा समर्पित (सरेंडर) करण्याची सवलत दिनांक 15.1.2001 च्या शासन निर्णयानुसार दिनांक 1.2.2001 पासून बंद करण्यात आली आहे.

            मात्र सेवानिवृत्तीच्यावेळी (नियम क्रमांक 68 अन्वये) एखाद्या कर्मचा-याच्या खात्यावर शिल्लक असलेल्या अर्जित रजेचे, जास्तीत जास्त 300 दिवसांच्या अधिन राहून, रोखीकरण केले जावू शकते.  यासाठी पुढील सूत्र विहित करण्यात आले आहे. 

रजेचे रोखीकरण = अखेरचे वेतन + महागाई भत्ता   X शिल्लक अर्जित रजा.

                                              30

            न उपभोगलेल्या अर्जित रजेचे रोखीकरण करण्याची सवलत नियमानुसार कोणत्याही प्रकारे सेवानिवृत्त होणा-या कर्मचा-यास मिळू शकेल.  तसेच सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कूटूंबियांस देखील मिळू शकेल.  एखाद्या कर्मचा-याने सेवेचा राजीनामा दिला किंवा सेवा सोडली तर त्याच्या खात्यावर शिल्लक असलेल्या एकूण अर्जित रजेपैकी अर्ध्या रजेचेच रोखीकरण त्यास मिळू शकेल व ते 150 दिवसांपेक्षा अधिक असणार नाही. मात्र ज्या कर्मचा-यास सेवेतून काढून टाकण्यात येते किंवा बडतर्फ करण्यात येते अशा कर्मचा-यास वरीलप्रमाणे रोखीकरणाचा फायदा मूळीच मिळत नाही.

10.अर्धवेतनी रजा:-

            (नियम क्रमांक 60 व 70. शासन निर्णय क्रमांक अरजा. 2488/395/सेवा 9, दिनांक 9.11.90) अर्धवेतनी रजा सर्व कर्मचा-यांना लागू असेल.  दिनांक 31.12.1990 पर्यंत ही रजा कर्मचा-याने पूर्ण केलेल्या सेवेच्या प्रत्येक वर्षासाठी 20 दिवस या दराने मिळत होती. दिनांक 9.11.1990 च्या शासन निर्णयानुसार (20 दिवस हे प्रमाण कायम होऊन) वर्ष मोजण्याच्या व रजा नोंदण्याच्या पध्दतीमध्ये बदल झाला आहे.

            आता प्रत्येक कर्मचा-याच्या बाबतीत प्रत्येक वर्षाच्या जानेवारी व जुलै या महिन्याच्या पहिल्या दिवशी दोन सहामाही कालावधीसाठी प्रत्येकी 10 दिवस अशी दोन हप्त्यांमध्ये अर्धवेतनी रजा आगाऊ जमा करण्यात येईल.  ज्या कर्मचा-यांना दिनांक 31.12.1990 रोजी सेवेचे वर्ष पूर्ण होईल त्यांना जुन्या नियमाप्रमाणे देय असलेली 20 दिवस व नविन नियमाप्रमाणे दिनांक 1.1.1991 पासून देय होणारी 10 दिवस अशी रजा एकदम मिळू शकेल.

            ही रजा साठवून ठेवण्यावर अर्जित रजेप्रमाणे कोणतेही बंधन नाही.  एखादा कर्मचारी निलंबित असेल तर पुढील सहामाहीचा हिशोब करताना मागील सहामाहीतील एकुण निलंबनाच्या दिवसांच्या 1/18 एवढी रजा 10 दिवसांच्या कमाल मर्यादेत वजा करावी.  रजेचे दिवस अपूर्णांकात येत असल्यास नजीकच्या दिवसात पूर्णांकित करावेत.

            वरीलप्रमाणे देय असणारी रजा नियम क्रमांक 60(बी) नुसार कर्मचा-यास खाजगी कारणास्तव मंजूर करता येईल.  नियम क्रमांक 70(2) अन्वये अशा रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी जे वेतन  कर्मचा-यास लागू असेल त्याच्या निम्म्या दराने त्यास रजेच्या कालावधीत वेतन मिळेल.  (कारण ही अर्धवेतनी रजा आहे) व योग्य त्या प्रमाणात इतर भत्तेही मिळतील.

11.परिवर्तित रजा:-

            (नियम क्रमांक 61) शासकीय कर्मचा-यांच्या सेवापुस्तकामध्ये अर्जित रजा व अर्धवेतनी रजा या दोन प्रकारच्या रजांचाच लेखा ठेवला जातो, इतर रजांचा नाही.  परंतु यापैकी अर्धवेतनी रजेशी संबंधित व त्या खात्यावर खर्च पडणारा म्हणून परिवर्तीत रजेचा प्रकार महत्वाचा आहे.

            कर्मचा-यांना मुख्यत: वैद्यकीय कारणास्तव परिवर्तीत रजा मंजूर केली जाते व जेवढे दिवस परिवर्तीत रजा दिली जाते त्याच्या दुप्पट दिवसती अर्धवेतनी रजेच्या खात्यावर खर्च टाकली जाते. म्हणजेच अर्धवेतनी रजेच्या खात्यावर जेवढे दिवस रजा शिल्लक असेल त्याच्या निम्मे दिवस परिवर्तीत रजा मंजूर होऊ शकते. उदा. एखादा कर्मचा-याने 20 दिवस परिवर्तीत रजा घेतली तर त्याच्या अर्धवेतनी रजेच्या खात्यावर 40 दिवस रजा खर्च पडेल.  वेतन मात्र 20 दिवसांचे पूर्ण मिळेल.

            ही रजा मंजूर करतेवेळी संबंधित कर्मचारी रजा संपल्यानंतर कामावर हजर होण्याची खात्री असली पाहिजे.  त्याने मध्येच राजीनामा दिल्यास किंवा तो स्वेच्छेने सेवानिवृत्त झाल्यास परिवर्तीत रजेच्या काळात त्याने काढलेले वेतन व त्यास अर्धवेतनी रजेच्या काळात मंजूर झाले असते असे वेतन यांमधील फरकाची रक्कम त्याच्याकडून वसूल करण्यात येईल.

            परिवर्तीत रजा आणखी एका कारणास्तव मंजूर करता येते. एखाद्या कर्मचा-यास त्याच्या पदाशी संबंधित व सार्वजनिक हिताच्या दृष्टीने आवश्यक असा पूर्णवेळ किंवा अर्धवेळ अभ्यासक्रम पूर्ण करणे आणि अंतिम परीक्षेची तयारी करणे या कारणासठी (वैद्यकीय प्रमाणपत्र दाखल न करता) संपूर्ण सेवेच्या कालावधीत जास्तीत जास्त 90 दिवस पर्यंत परिवर्तीत रजा मिळू शकेल.

            नियम क्रमांक 70(3) अन्वये परिवर्तीत रजेच्या कालावधीत, अशा रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी त्या कर्मचा-यास ज्या दराने वेतन मिळते त्याच दराने परिवर्तीत रजेच्या कालावधीत त्यास वेतन मिळेल.

“विपश्यना” किंव “योगविद्या” शिबिरास उपस्थित राहण्यासाठी रजा:-

            (शासन निर्णय दिनांक 21.7.1998दिनांक 27.6.2003दिनांक 3.2.2004)  विपश्यना रिसर्च इन्स्टिटयूट, धम्मगिरी, इगतपुरी (जिल्हा नाशिक) यांच्यामार्फत महाराष्ट्रामधील निरनिराळया केंद्रांमध्ये, व कैवल्यधाम, लोणावळा या संस्थेतर्फे लोणावळा व मुंबई येथे अनुक्रमे “विपश्यना” व “योगविद्या” प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात.  या शिबिरांना उपस्थित राहण्यासाठी राजपत्रित / अराजपत्रित कर्मचा-यांना परिवर्तीत रजा मिळू शकते.  यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही मात्र संबंधित केंद्राचे प्रवेशपत्र रजेच्या अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे.

            वरीलप्रमाणे मिळणारी परिवर्तीत रजा एका वेळी 14 दिवस इतकी मिळेल. ही रजा आवश्यकतेनुसार तीन वर्षातून एकवेळा व संपूर्ण सेवा कालावधीमध्ये कमाल 6 वेळा अनुज्ञेय असेल. या प्रशिक्षणाचा अपेक्षित खर्च संबंधित कर्मचा-यानेच करावयाचा आहे मात्र प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्रानंतर कार्यालयास सादर करावयाचे आहे.

12.अनर्जित / नादेय रजा (लीव्ह नॉट डयू):-

            (नियम क्रमंाक 62) अनर्जित रजा कायम सेवेतील कर्मचा-यांना अर्धवेतनी रजेच्याच खात्यावरुन आगाऊ मंजूर करता येते.  अशी रजा संपल्यानंतर कर्मचारी कामावर परत हजर होण्याची सक्षम प्राधिका-यास खात्री असली पाहिजे.  तसेच कर्मचारी कामावर परत हजर झाल्यानंतर, जेवढे दिवस त्याने अनर्जित रजा घेतलेली असते तेवढे दिवस रजा अर्धवेतनी रजेच्या खात्यावर नंतर तो मिळवेल याची देखील अधिका-यास खात्री असली पाहिजे तरच ही रजा मंजूर करता येते.

            उदा. एखाद्या कर्मचा-याने 40 दिवस अनर्जित रजा घेतली तर, तेवढे दिवस रजा अर्धवेतनी रजेच खात्यावर मिळविण्यासाठी त्याला दोन वर्षे लागतील.  कारण अर्धवेतनी रजा एका वर्षाला 20 दिवस या प्रमाणात मिळते.  म्हणजे या प्रकरणी कर्मचारी रजेवरुन परत आल्यानंतर किमान दोन वर्षे सेवेत राहण्याची खात्री असली पाहिजे.

            जेव्हा अशी अर्धवेतनी रजा त्याच्या खात्यावर जमा होईल तेव्हाच त्याने घेतलेली अनर्जित रजा त्यात समायोजित होईल. अनर्जित रजेवर असताना त्या कर्मचा-याने राजीनामा दिल्यास किंवा तो स्वेच्छेने सेवानिवृत्त    झाल्यास त्यास देण्यात आलेले रजावेतन त्याच्याकडून वसूल केले जाईल. मात्र रुग्णावस्थेमुळे असे घडल्यास त्याच्याकडून वेतनाची वसूली करण्यात येणार नाही.

            एखाद्या कर्मचा-यास संपूर्ण सेवेच्या कालावधीत जास्तीत जास्त 360 दिवसांपर्यंत अनर्जित रजा मिळू शकते.  त्यापैकी वैद्यकीय कारणाखेरीज अन्य कारणास्तव एकावेळी जास्तीत जास्त 90 दिवस व सर्व मिळून (अशा कारणास्तव) जास्तीत जास्त 180 दिवस व वैद्यकीय कारणास्तव जास्तीत जास्त 180 दिवस ही रजा मिळू शकेल.

            मात्र जेवढे दिवस रजा घेतली असेल त्याच्या दुप्पट दिवस अर्धवेतनी खात्याला खर्च टाकण्याचा परिवर्तीत रजेसारखा लाभ या प्रकारात मिळत नाही.  वैद्यकीय कारणास्तव ही रजा घेतली तरी जेवढयास तेवढेच दिवस अर्धवेतनी खात्यावर खर्च पडेल व वेतन अर्धवेतनी रजेप्रमाणेच मिळेल परिवर्तीत रजेप्रमाणे नाही.

13.असाधारण रजा:-

            (नियम क्रमांक 63 व 70(4)) एखाद्या कर्मचा-यास विशेष परिस्थितीमध्ये व अन्य कोणतीही रजा अनुज्ञेय नसेल तेव्हा असाधारण रजा मंजूर करता येते किंवा इतर रजा अनुज्ञेय असतानाही कर्मचा-याने तशी विनंती केल्यास ही रजा मंजूर करता येते.

            असाधारण रजेची नोंद सेवा पुस्तकात लाल शाईने घेण्यात यावी.  अस्थाई कर्मचा-यास साधारणपणे तीन महिन्यांसाठी असाधारण रजा मंजूर करता येते, शिवाय पुढे नमूद केलेल्या कारणांसाठी त्यांच्यापुढे नमूद केलेल्या कालावधीएवढी असाधारण रजा मंजूर करता येते.

  • अस्थायी कर्मचा-यास तीन महिने
  • तीन वर्षाची सेवा पूर्ण झाली असेल तर वैद्यकीय कारणास्तव 6 महिने.
  • पाच वर्षाची सेवा पूर्ण झाली असेल तर वैद्यकीय कारणास्तव 12 महिने
  • एक वर्षाची सेवा सलगपणे पूर्ण झाली असेल व कर्करोग किंवा मानसिक आजारावर उपचारासाठी रजा घ्यावयाची असेल तर 12 महिने.
  • एक वर्षाची सेवा पूर्ण झाली असेल व कर्मचा-यास क्षयरोग इत्यादीवर उपचार करुन घ्यावयाचे असतील तर 18 महिने.
  • लोकहितार्थ उपयुक्त अशा व प्रमाणित अशा अभ्यासक्रमासाठी व कर्मचा-याची सेवा सलगपणे 3 वर्षे झालेली असली पाहिजे तेव्हा 24 महिने पर्यंत ही रजा मिळू शकते. मात्र अशा अभ्यासक्रमानंतर पुढे किमान 3 वर्षे शासनाची सेवा सोडता येणार नाही.

            नियम क्रमांक 70(4) नुसार असाधारण रजेच्या कालावधीत कर्मचा-यास कोणतेही वेतन मिळत नाही.  (मात्र त्यास देय असल्यास स्थानिक पुरक भत्ता व घरभाडे भत्ता मिळू शकतो) खाजगी कारणास्तव घेतलेल्या असाधारण रजेचे दिवस वेतनवाढीसाठी व निवृत्तीवेतनासाठी गृहित धरले जात नाहीत. मात्र वैद्यकीय कारणास्तव असाधारण रजा असेल तर तो कालावधी वेतनवाढीसाठी व निवृत्तीवेतनासाठी गृहित धरला जातो.

अ.भूतलक्षी प्रभावाने असाधारण रजा:-

            नियम क्रमांक 63(6) शासन निर्णय दिनांक 2.6.2003) एखादा कर्मचारी विनापरवानगी अनुपस्थित राहिला असेल तर तो कालावधी भूतलक्षी प्रभावाने असाधारण रजेमध्ये रुपांतरीत करता येतो. या संबंधात नियुक्ती प्राधिका-यास पूर्ण अधिकार आहेत. अस्थायी कर्मचा-यांच्या बाबतीत 90 दिवस पर्यंत व स्थायी कर्मचा-याच्या बाबतीत 1 वर्ष पर्यंत अशी रजा सर्वसाधारणपणे मंजूर करता येईल. मात्र त्यापेक्षा अधिक रजा असेल तर पुढील कार्यपध्दतीचा अवलंब करावा लागेल.

            ज्या दिनांकापासून संबंधित कर्मचारी गैरहजर होता त्यापूर्वी त्याची किमान 5 वर्ष सेवा झालेली असावी. त्या कर्मचा-याने वेळोवेळी त्याच्या अनुपस्थितीबाबत अर्जाद्वारे कार्यालयास माहिती दिली असल्यास व त्याची अनुपस्थिती समर्थनीय असल्यास या कालावधीसाठी देय व अनुज्ञेय रजा मंजूर करण्याबाबत सक्षम प्राधिका-याने निर्णय घ्यावा.  मात्र त्याची अनुपस्थिती समर्थनिय नसेल तर त्याच्या विरुध्द शिस्तभंगाची कारवाई सुरु करावी.

            असमर्थनीय अशा कारणासाठी कर्मचारी अनुपस्थित असतील तर तो संपूर्ण कालावधी “अकार्य-दिन” (Dies-non) / असाधारण रजा म्हणून घोषित करावा व हा कालावधी कोणत्याही प्रयोजनासाठी ग्राहय धरला जाणार नाही अशी स्पष्ट नोंद त्याच्या सेवा पुस्तकामध्ये घेण्यात यावी.

ब.”विशेष असाधारण रजा योजनेच्या” ठळक तरतुदी:-

            (शासन निर्णय दिनांक 7.10.2002दिनांक 22.12.2006 ) “विशेष असाधारण रजा योजना” ही उपरोक्त आदेश निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून लागू करण्यात आली आहे.  अगोदर दिनांक 31.12.2004 पर्यंतच या योजनेची मुदत होती.  त्यानंतर एक वर्षा ने व आता आणखी एक वर्षाने या योजनेची मुदत वाढविण्यात आली आहे, सध्या या योजनेची मुदत दिनांक 31.12.2006 पर्यंत आहे.

            ही योजना शिक्षक, डॉक्टर, परिचारिका, परिचारक व पोलीस या संवर्गातील कर्मचा-यांना लागू नाही व अभियांत्रिकी सेवेतील कर्मचारी / अधिकारी यांच्यापैकी जास्तीत जास्त 10% कर्मचा-यांचेच अर्ज मंजूर करण्यात यावेत अशी तरतूद आहे.   किमान 5 वर्ष् सेवा झालेली असेल तरच ही योजना लागू होईल.

            किमान 1 वर्ष व कमाल 5 वर्ष या मर्यादेमध्ये घ्यावयाची ही रजा नियुक्ती प्राधिका-याच्या पूर्व मंजुरीनेच उपभोगणे आवश्यक आहे.  अनधिकृतपणे गैरहजर असणा-या कर्मचा-यांना विशेष असाधारण रजा मंजूर करता येणार नाही. या योजनेचे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे या रजेच्या कालावधीत संबंधित कर्मचारी / अधिकारी आपल्या सेवेशी संबंधित नसलेली एखादी खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करु शकतील.  त्यासाठी सक्षम प्राधिका-याच्या पूर्व मंजुरीची आवश्यकता नाही.  मात्र त्याबाबतचा तपशील सक्षम प्राधिका-यास कळविणे आवश्यक राहील.

            या रजेच्या कालावधीत वेतन व कोणतेही भत्ते अनुज्ञेय नसले तरी या कालावधीत कर्मचा-यास ज्या वेतनवाढी मिळू शकल्या असत्या त्या काल्पनिक रित्या गृहित धरुन रजेवरुन परत आल्यानंतरचे वेतन दिले जाईल तसेच त्याच आधारे निवृत्तीवेतन विषयक लाभांची परिगणना केली जाईल. विशेष असाधारण रजेच्या कालावधीत कर्मचा-याची सेवा ज्येष्ठता अबाधित राहील व हा कालावधी निवृत्तीवेतनासाठी अर्हताकारी सेवा म्हणून विचारात घेतला जाईल.  मात्र याकाळात अर्जित व अर्धवेतनी रजा त्याच्या खात्यावर जमा होणार नाहीत.

            विशेष असाधारण रजेच्या कालावधीत संबंधित कर्मचा-याचे पद रिक्तच ठेवण्यात यावे.  तसेच पदाच्या संबंधाने मिळणारे कोणतेही फायदे / सोयी सुविधा उदा. दूरध्वनी, शासकीय वाहन, रजा प्रवास सवलत, स्वग्राम रजा प्रवास सवलत त्यास अनुज्ञेय होणार नाहीत.  शासकीय निवासस्थानात कर्मचारी रहात असेल तर त्याला रजेच्या पहिल्या 12 महिन्यांसाठी सामान्य दराने व त्यानंतर आर्थिक दराने अनुज्ञप्ती शुल्क भरावे लागेल.

            विशेष असाधारण रजेच्या कालावधीत गट विमा योजना वर्गणी घेण्यात येईल मात्र भविष्य निर्वाह निधीची वर्गणी घेण्यात येणार नाही व आयुर्विमा योजना, पोस्टाच्या योजना, सहकारी संस्थांची देणी याबाबतची जबाबदारी संबंधित कर्मचा-याचीच असेल. विशेष असाधारण रजेवर असताना एखाद्या कर्मचा-याचा मृत्यू झाला तर तो कर्मचारी सेवेत असताना मृत्यू पावला असता तर त्याच्या कुटूंबियास जे लाभ अनुज्ञेय ठरले असते तेच लाभ मंजूर केले जातील फक्त त्याने उपभोगलेल्या रजेचे वेतन व भत्ते अनुज्ञेय राहणार नाहीत.  दिनांक 31.12.2006 पर्यंत या योजनेची मुदत असल्यामुळे त्या अगोदर ज्यांची रजा सुरु होईल त्यांनाच उपरोक्त नियम लागू रहातील. ( शा. नि. दिनांक 22.12.2006 अन्वये ही रजा आता रद्द करण्यात आली आहे. )

Leave a Reply